Tuesday, February 8, 2011

पुणेकर आणि पुण्यातली ट्राफिक समस्या

एका पुणेकराची "पुण्यातील वाहतूक" या विषयावर घेतलेली ही मुलाखत.


कोणते वाहन चालवतो हे फारसे महत्वाचे नाही. पुलंनी सांगितल्याप्रमाणे पुण्यात कोणतेही वाहन चालवणे म्हणजे हत्यार चालवण्यासारखेच आहे. 
२) पुण्यातील वाहतुकीची समस्या एवढी गंभीर होत आहे. पुणे आता देशातील सर्वाधिक दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ? 

पुणेकर -
आम्हा पुणेकरांना प्रत्येक गोष्टीबाबत काहीतरी वेगळे वाटत असते असे तुम्हाला का वाटते ? काहीही वाटत नाही, सकाळ संध्याकाळ रस्त्यावर असताना
लोकांना, सरकारला शिव्या देत जायचे आणि घरी आल्यावर सगळे विसरायचे. बास ! 

३) वाहतुकीच्या समस्येबद्दल पुण्याबाहेरून आलेले लोक जबाबदार आहेत असे तुम्हाला वाटते का ? 

पुणेकर - आम्ही आतले, बाहेरचे असा भेदभाव करत नाही. कोण गाडी चालवत आहे, यावर आपला टोमणा ठरतो. तरुण मुलगा असेल तर, "बापाच्या पैशावर
मजा मारतात साले", तरुणी/बाई असेल तर, "या बायकांना जन्मात गाडी चालवता येणार नाही.". म्हातारा(५५+) मनुष्य असेल तर, "या वयात झेपत
नसताना गाडी चालवायची कशाला ?" असा शेरा तयार असतो.

४) वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक विभाग निरनिराळ्या योजना आखत असते. त्याचा काही फायदा होतो असे तुम्हाला वाटते का ? 

पुणेकर - वाहतूक विभागाच्या तथाकथित योजना मी फक्त वर्तमानपत्रात वाचतो. मोठा गाजावाजा करून असल्या योजना सुरु करतात. खुद्द रस्त्यावर काही दिसत
नाही. चौकातील कॅमेरे चालू नसतात. रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा नसतात. आपण काहीतरी योजना आखतोय असे दाखवणे हे त्यांचे काम आहे. ते करतात. 
करू दे.
५) महानगरपालिका वाहतुकीसाठी काही करते का ?  
पुणेकर - महानगरपालिका फक्त रस्ते खोदते आणि वाहतुकीची समस्या वाढवते. सांगितलेल्या वेळेत रस्ता कधीच कसा पूर्ण होत नाही ? महानगरपालिकेने वाहतूकीबाबत केलेला सर्वात मोठा विनोद म्हणजे बी.आर.टी. असावा. या योजनेत त्यांना नक्की काय करायचे आहे, हे त्यांना तरी ठावूक आहे का ? 
५) जर महानगरपालिका काही करत नाही, तर तुम्ही महानगरपालिकेतील सत्ता बदलत का नाही ? 

पुणेकर -
तुम्ही वाहतुकीबद्दल मुलाखत घेत आहात ना, मग वाहतुकीबद्दल बोला, उगाच राजकारणात घुसू नका. 

६) वाहन चालवणाऱ्या इतर लोकांबद्दल आपल्याला काय वाटते ? 

पुणेकर -
ती माझ्यासारखीच माणसे आहेत. एखादा माणूस कोणते वाहन चालवतो यावर त्याच्याबद्दलचे मत ठरते. चारचाकीवाले पैशाचा माज असलेले असतात.
दुचाकीवाले उगीच भाव खाणारे आणि जमेल तेथे घुसणारे असतात. रिक्षावाले अडाणी, भांडखोर असतात. पादचाऱ्यांना कसे चालावे ते समाजात नाही.
पी.एम.टी. च्या वाहनचालकांद्दल तर बोलायलाच नको. वाहन चालवणाऱ्या सगळ्यांना रस्ता आपल्या बापाचाच आहे असे वाटत असते. 

७) वाहतूक विभागातील पोलिसांबद्दल आपणास काय वाटते ? 

पुणेकर - पोलिसांबद्दल कोण चांगले बोलतो का ? मला वाटते फक्त गृहमंत्रीच पोलिसांबद्दल चांगले बोलत असावेत. पोलीस म्हणजे पैसे खाणारे, एवढेच आम्हाला
कळते
.
८) वाहतुकीच्या कायद्यांबद्दल जागृती नाही म्हणून असे घडत आहे का ? 
पुणेकर - पुण्यातील वाहतुकीचे कायदे हे relative असतात. तुमच्या गाडीला कोणाची धडक बसली आहे कि तुम्ही कोणाला धडकला आहात, यावर कायदे
ठरतात. इथल्या वाहतुकीत सगळे relative असते. समोरच्याला पिवळा सिग्नल असतान आपण गाडी पुढे नेतो. "२ सेकंदच तर आधी निघतो आहे. त्यात
एवढे काय" असे आपल्याला वाटते. समोरचा माणूस पण असाच विचार करतो आणि २ सेकंद उशिरा निघतो. हे मात्र आपल्याला चालत नाही.

९) या वाहतुकीमुळे काही फायदा होतो का ? 

पुणेकर -
आता घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगले शोधायचे. सिग्नल पलीकडील झाडामागचा पोलीस शोधताना नजर तीक्ष्ण होते.पोलिसांनी पकडल्यावर
वाटाघाटींमध्ये आपण तरबेज होतो. पोलींसमोर रडवेला चेहरा करताना अभिनयकौशल्य सुधारते. भांडण करताना जरी आपलीच चूक असली तरी भांडून वाद विवादाची तयारी होते. एफ. एम. वाल्यांना वाहतुकीवर कार्यक्रम करता येतात. असे बरेच फायदे शोधता येतील. 

१० ) तुम्ही पुणेकरांना काही संदेश द्याल का ? 

पुणेकर -
काहीही करा, फक्त माझ्या गाडीखाली येवू नका. बाकी पुणेकर सुज्ञ आहेतच. 

Tuesday, October 5, 2010

श्री गणेशा..

नाही हो नाही हो म्हणता म्हणता शेवटी ब्लॉग लिहिण्याचा योग जुळला..
तश्या आठवणी खूप जास्त आहेत लवकरच अपडेट करण्याचा प्रयत्न करेन..

आपला 

पुष्कर जोशी 
पुणेकर 

Monday, October 4, 2010

माझा नावडता ऋतू

माझा नावडता ऋतू


भारत देशात तीनच ऋतू असतात. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. त्यापैकी माझा सगळ्यात नावडता ऋतू म्हणजे पावसाळा. हा ऋतू नेमेचि येतो. बाकीचे नेमेचि येतातच असे नाही असे म्हणतात.

जून ते सप्टेंबर या चार 
महिन्यांत पावसाळा मला भंडावून सोडतो. जूनच्या सुरुवातीला ईशान्य, नैऋत्य, वायव्य आणि आग्नेय या अगम्य दिशांपैकी कुठल्यातरी एका दिशेने मोसमी वारे दर वर्षी आपल्याकडे चाल करून येतात आणि चार महिने धुमाकूळ घालतात. मोसमी चटर्जी नावाची एक नटी होऊन गेली की आहे. आधी हा गडी दगडी चाळीत दडी मारून बसतो. आपण "हरलो बुवा" असं म्हटलं की मगच तो येतो. मग सुरुवातीला पावसाबरोबर विजांचेही तांडव आपल्याला बघायला मिळते. मला विजांची खूप भीती वाटते. (घरात वीज गेली तरी भीती वाटते, आली तर विचारूच नका). पाऊस पडायच्या आधी खूप सारे नखरे करून घेतो. वादळी वारे आणून घरातली रद्दी बाहेर आणि बाहेरची धूळ आत असे पसारे करून ठेवतो, ते मलाच आवरावे लागतात. पावसाळा आपल्याबरोबर नाजूक पंखांचे असंख्य किडे घेऊन येतो (आणि परत मात्र घेऊन जात नाही). त्या किड्यांना माझ्या शर्टापासून दूर ठेवण्यासाठी मला ट्यूबलाईट बंद करून बसावे लागते. अंधारात त्या किड्यांना मी दिसत नाही. 

दिवस रात्र पावसाने जोर धरला की माझे (धुतलेले) कपडे वाळत नाहीत. त्याचबरोबर सर्वत्र गवत माजते आणि बेडकांच्या ड्र-काळ्यांनी माझी झोप उडाल्यासारखी होते. मला बेडूक उड्या मारता येतात. माझ्या 
चपलात्यांच्याबरोबर बाहेरचा चिखल घरात घेऊन येतात आणि राडा करतात. नको त्या गोष्टी घरात घेऊन येणं त्यांना बरोबर जमतं. अति पावसामुळे नदी-नाले, झरे-ओढे, तलाव-तळी, बाथरूम-बेसीन इ. मधील पाण्याची पातळी वाढते. धरणांना पाण्याचे ओझे सहन न झाल्यामुळे ते आपले बांध फोडतात आणि पाण्याला वाट मोकळी करून देतात. नद्यांबरोबर साहित्यिकांच्या प्रतिभेलाही पूर आल्यासारखे होते आणि वेगवेगळ्या प्रमाणात पाणी घालून कमी-अधिक लांबीच्या कवितांचे पेव फुटते. कावळ्यांसाठी आणि कुत्र्यांसाठी निसर्ग छत्र्यांची व्यवस्था करतो. मात्र दर वर्षी किती छत्र्या हव्यात याचा अंदाज कसा चुकतो ते कळत नाही. आकार मोठा करण्याऐवजी जास्त संख्येत छत्र्या केल्या तर त्या पुरतील असा त्याचा समज असावा. दर वर्षी नेमाने माझी मात्र छत्री हरवते आणि छत्रीवीण पोरका मी छत्र शोधत, भिजत वाट काढतो. रस्त्यावर सर्वत्र चिखल होतो, तो हळूच माझ्या मोज्यांमध्ये शिरला की जीव नकोसा होतो.

जेव्हा हवा तेव्हा पाऊस कधीच येत नाही. तो फार मानी आहे. त्या मानाने उन्हाळा किंवा हिवाळा चांगली शिस्त पाळतात. पाऊस हवा असेल तर पावसाला पैसा देऊ करावा लागतो. खोटा पैसा दिला तर मोठा पाऊस येतो असा एक सार्वत्रिक समज आहे. असा मोठा पाऊस आल्यावर बाहेर ठेवलेली मडकी, माठ, मालमोटारी, पाणी इ. वाहून जातात. म्हणून मी मडकी आधी घरात आणून ठेवतो. पाऊस यायच्या आधीच दूरदर्शन आणि रेडिओवाले पावसाच्या गाण्यांचा पाऊस पाडून घेतात. घनन घनन पासून पाSSऊSSस पहिला जणू सानुला पर्यंत, अबके सावन ऐसे बरसे पासून श्रावणात घननीळा बरसला पर्यंत (हो, टीप-टीप बरसा पण), सगळी गाणी तीनदा ऐकवून झाल्याखेरीज त्यांची तहान भागत नसावी. चातक नावाचा पक्षी म्हणे फक्त पावसाचंच पाणी पितो. म्हणजे बाकी वर्षभर त्याला निर्जळी उपास घडत असणार. पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी येतं. (म्हणजे, इतर वेळी पाणी येत नाही).

असा हा पाऊस काही लोकोपयोगी गोष्टीसुध्दा करतो. भारत हा शेतीपरधान देश आहे. शेतीला पाणी पुरवण्याचे काम मुख्यतः पाऊस करतो. हे काम तो मोबदला न घेत करत असल्याने त्याची मनमानी शेतकरी सहन करतो. खरीप पिकांची लागवड पाऊस आल्यानंतरच होते. भाताला दुप्पट पाणी लागते - पाऊस ते देतो. नदीच्या पाण्याची अडवणूक करून आपण आपल्या पोटापाण्याची सोय करतो. त्या नद्यांना पाणी हा पाऊसच पुरवतो. त्या पाण्याचे बिल मात्र आपण सरकारचे खाती भरतो. उन्हाळ्यात झाडे, इमारती, जुन्या मोडक्या मोटारी, उघडेबोडके डोंगर यांच्यावर प्रचंड प्रमाणात धूळ साचते. ती अंतराळातून येत असावी. त्या सगळ्यांन स्वच्छ आंघोळ घालण्याचे काम पाऊस करतो. लक्स साबण त्याला आवडतो. मला आवडत नाही. त्याचबरोबर, सहा महिने झोपलेल्या बेडकांना (ज्यांना खूप भूक लागलेली असते) उठवण्याचा उदीम पाऊस करतो. पाऊस स्वतःबरोबर हिरवी शाल घेऊन येतो आणि ती निसर्गावर पांघरतो. दर वर्षी नवी शाल अशा तर्हेने निसर्गाला (फुकटात) मिळत असते. अशा प्रकारे पाऊस आपल्या सर्वांच्या उपयोगासही सरसकट धावून येतो. शिवाय हवामानखात्याशी अंदाजपंचे लपाछपी खेळून तिथल्या वैज्ञानिकांना सतत बिझी ठेवण्याचे उद्योग तो करतो. 

असे सगळे असले तरी पाऊस माझा नावडता ऋतू आहे. कारण---
- मला बाहेर जायचे असले की तो (धड)पडतो.
- मी ऑफिसला पोहोचलो की त्याची शिफ्ट संपते आणि उन्हाची सुरू होते. मला तसेच ओले बसावे लागते. थोड्या वेळाने खुर्ची ओली होते आणि लोकांचे गैरसमज होतात.
-लहानपणापासूनच माझा हा नावडत ऋतू आहे कारण पावसाळा सुरू झाला की शाळाही उघडायची. बरे एवढाही तो पडायचा नाही की शाळेभोवती तळे साचावे!
-कुठे ना कुठे चिखलात माझा पाय फसतो आणि नवे बूट खराब होतात. या चिखलास कारणीभूत असतो तो पाऊस!
- पावसाच्या कवितांचा शिडकावा होत नाही -- मारा होतो. अक्षरशः गड-बुडून जायला होते.
- दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुराचे पाणी आमच्या घरात शिरले होते. तेव्हा पाण्याबरोबर तो जे काही घेऊन आला (आणि जे काही घेऊन गेला) त्याच्या आठवणींनी आजही माझ्या रेनकोटवर काटा उभा राहतो.
- पावसाळ्यात मला सर्दी होते. सर्दीवर अजून कुठलेच औषध सापडलेले नाही. सर्दी मला आवडत नाही. विशेषतः नाक चोंदले की तोंडाने श्वास घ्यावा लागतो. ते आवडत नाही.
- पावसाळ्यात मासेमारी बंद होते आणि चांगला फिश मिळत नाही खायला.
- पावसाळ्यात सारखे सारखे जायला लागते. असो.
- अशी अनेक कारणे


************
पावसाळा माझा नावडता कसा हे जसे मी आपल्याला पटवून दिले तसेच पावसाळा माझा आवडता कसा हेही पटवून देऊ शकतो. त्यामुळे वरील मतांमुळे माझ्याबद्दल कुठलेच मत करून घेऊ नका. पावसासारखा मीही हुलकावणी देण्यात पटाईत आहे. मैने भी बहुत पावसाळे देखे है म्हटलं!